पुणे : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई-पुणेमहामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. खालापूर फूड मॉलजवळ पहाटे पाच वाजता दोन अवजड वाहनांचा भयंकर अपघात झाला. त्यानंतर एक कारही वाहनांवर येऊन आदळली. यात दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे मिसिंग लिंक जवळ वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे जुन्या मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणेमहामार्गावर खालापूर फूड मॉल जवळ दोन मालवाहू ट्रकची भीषण धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, एका ट्रकचा समोरील भागाचा चक्काचूर झाला, तर दुसर्या ट्रकची चेपला गेला. अपघातानंतर दोन्ही ट्रक रस्त्यावर पडले.
मिसिंग लिंक बंद, वाहतूक जुन्या मार्गाने वळवली
पहाटे पाच वाजता झालेल्या या अपघातानंतर पोलीस प्रशासन आणि बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर जखमींना रुग्णालयात नेण्याचे काम हाती घेण्यात आले. वाहनांच्या धडक देण्याची तीव्रता इतकी होती की दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात मिसिंग लिंकजवळच झाल्याने पुण्यावरून मुंबईला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे मिसिंग लिंकवरील वाहतूक बंद करून ती जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळण्यात आली. त्यानंतर अपघातग्रस्त वाहने हटवण्यात आली. बराच वेळानंतर मिसिंग लिंक रोड सुरू करण्यात आला. त्यानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत झाली.